web counter
Visit Counter
ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार? आज निकाल
लातूर- ग्रामपंचायत सरपंच व सदस्यपदासाठी शनिवारी झालेल्या मतदानाची मोजणी आज होणार असून जनतेतून थेट सरपंचपदासाठी मतदान झाल्याने प्रत्येक गावात ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची व चुरशीची झाली. गाव कारभाऱ्यांच्या राजकीय भविष्याचा आज फैसला असल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतींपैकी २७ सरपंच आणि ५६७ सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले असून, आता ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता दहा तालुक्यांत सुरू होणाऱ्या मतमोजणीतून ३२४ सरपंच अन् २५७८ सदस्यांचे भवितव्य ठरणार आहे. शनिवारी ११४५ मतदान केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यात सरासरी ७८ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रियेसाठी ४५८० अधिकारी-कर्मचारी तैनात होते. जिल्ह्यातील ७२ संवेदनशील मतदान केंद्रांवरही मतदान शांततेत झाले असले तरी आता मतमोजणीतून काय चित्र समोर येते, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. ३३३ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले असून, सर्व राजकीय पक्ष व संघटनांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुकांचे खास तीन वैशिष्ट्य होती. त्यात पहिले ऑनलाईन अर्ज, दुसरे शौचालय बांधणे सक्तीचे आणि तिसरे सरपंच पद थेट मतदारांतून निवडून देण्याचे. या तीन मुद्यांमुळे ३५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना वेगळा आयाम प्राप्त झाला असून, आता प्रत्यक्षात शनिवारी झालेल्या ३३३ ग्रामपंचायतींच्या निवडीसाठी मतदान झाले. या मतदानाचे निकाल काय आहेत, याची काळजी सर्वच पक्षांसह जिल्ह्यातील मतदारांना लागली आहे. काल झालेल्या मतदानात पुरुष ३१५९६८, महिला २७४७४७ व इतर १, अशा एकूण ५९०७१६ मतदारांपैकी ७८ टक्के मतदारांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. त्यामुळे निवडणुकांचे कल कोणाच्या बाजूने येणार, हे सांगणे कठीण आहे. यावेळी पहिल्यांदाच सरपंच पद थेट मतदारांतून निवडून द्यावयाचे असल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाली. पर्यायाने, इच्छुक नसणारे देखील निवडणुकीत सक्रिय झाल्याचे चित्र होते. प्रशासनासह राजकीय पक्षांचे, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आम माणूस देखील या निवडणुकीत मध्यवर्ती ठिकाणी असल्याने चुरस अधिक होती. प्रचारापासून ते मतदान होईपर्यंत कार्यकर्त्यांनी उसंत घेतली नाही, अशी चर्चा होती. लातूर जिल्ह्यातील अध्र्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी शनिवारी मतदान झाले. प्रत्येक गावाने निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने काट्याच्या टकरी झाल्या असून, मतदारराजा कोणाला हसवणार आणि कोणाला रडवणार, हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मतमोजणीची प्रक्रिया दहा तालुक्यांच्या तहसीलदारांनी निश्चित केलेल्या ठिकाणी पार पडणार आहे. जे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आहेत, त्यांना दोन दिवस झोप आली नसणार. सोमवारी सकाळी १० पासून प्रत्येक तालुक्यांत मतमोजणीस सुरुवात होणार आहे. या मोजणीतून कोणाला धक्का देणारे तर कोणाला दिलासा देणारे निकाल बाहेर येणार आहेत. मात्र, याची तमाम लातूर जिल्ह्यातील नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
औसा- तालुक्यातील आशीव, मातोळा, हसलगण, येल्लोरी, गुळखेडा, हिप्परगा, कवळी, माळकोंडजी, वांगजी, बिरवली, देवताळा येथील ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची मानली जाते. राजकीय दृष्टीने आशीव, मातोळा व हसलगण या ठिकाणी सरपंच म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना तालुका व जिल्ह्यातील प्रमुख पक्षासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी निवडणूक रिंगणात संधी दिली जाते. यामुळे या ठिकाणी सर्वच सरपंचपदाच्या उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. दरम्यान राजकीय जाणकार यांनी वॉर्डरचना व झालेल्या मतदानातून सरपंचपदाच्या उमेदवारांची गणिते मांडली असून निकालानंतर कोण बाजी मारणार, हे स्पष्ट होणार आहे.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us