web counter
Visit Counter
भूकंपग्रस्तांना घर हस्तांतरणासाठी दिलासा
औसा- भूकंपग्रस्तांना कबाले देताना मारलेल्या एका शासकीय 'खुट्टी'मुळे 23 वर्षांपासून घरांच्या मालकी हक्क, हस्तांतरण आणि त्याशी निगडित व्यवहार करता येत नव्हते. मात्र लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक मोठा निर्णय घेत आता भूकंपग्रस्तांना घरांच्या हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची आवश्यकता राहणार असून हे अधिकार स्थानिक ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भूकंपग्रस्तांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. भूकंपग्रस्तांच्या घरांच्या कबाले, वारसा हक्क व नोंदणीचे अधिकार आता ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. या मागणीसाठी अनेक वेळा भूकंपग्रस्त आणि राजकीय पक्षांनी निवेदने देऊन शासनाकडे सातत्याने पाठपुरावा चालविला होता. तीन महिन्या पूर्वी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी तालुक्यातील भूकंपग्रस्त गावांना भेटी दिल्यानंतर लोकांनी आपली कैफियत मांडली होती. त्याच वेळी त्यांनी भूकंपग्रस्तांना शब्द देत हा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल असे सांगितले होते व ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांनी हा निर्णय घेत हजारो भूकंपग्रस्तांना दिलासा दिला आहे. यामुळे औसा व निलंगा तालुक्यातील अ, व ब वर्गवारीच्या गावातील भूकंपग्रस्त लाभार्थ्यांची घरे व त्यांचा वारसांच्या नावे हस्तांतरण करणे तसेच लाभार्थी मयत असल्यास त्याचा वारसाला कायदेशीर वारसांच्या नावे वारसा हक्क नोंद करण्याचे अधिकार संबंधित ग्रामपंचायतींना बहाल करण्यात आले असून तसेच इतर घरांचे होणारे हस्तांतरण जसे विक्रीखत, वाटणी पत्र, बक्षीस पत्र, दान पत्र, व गहाणखत याचे अधिकार औसा व निलंगा तहसीलदार यांना प्रदान केले आहेत. गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असणारा भूकंपग्रस्तांचा हा जटील प्रश्न आता सुटला आहे. या निर्णयामुळे पुनर्वसन झालेल्या या अ वर्गातील 27 गावांना फायदा झाला आहे. त्यात आशिव व आशिव तांडा, बानेगाव, चिंचोली जोगण व गोटेवाडी, तपसे चिंचोली व लाडवाडी, दापेगाव, गंजनखेडा, गुबाळ, हारेगाव, हसलगण, जवळगा, कवळी, किल्लारी, तांडा, किल्लारी वाडी, लामजना, लिबाळा दाऊ व तांडा, माळकोंडजी, मंगरूळ, नदीहत्तरगा, नादुर्गा व तांडा, संक्राळ, सारणी, सरवडी, सिरसल, तळणी व तांडा, तुंगी बु,उतका व तांडा, येळवट, गाढवेवाडी, तर ब वर्गवारी च्या खालील 10 गावांना ही याचा फायदा होणार आहे देवताळा, वरवडा, माळुंब्रा, जावळी (मुगळेवाडी), तांबरवाडी, लोहटा (मसलगा), उजनी, हिप्परगा (कवळी), दावतपुर, मुदगड एकोजी गावांचा समावेश आहे. भूकंपग्रस्तांचा 23 वर्षांचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात निकाली काढल्याने जिल्हाधिकारी श्रीकांत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us