web counter
Visit Counter
शांत स्वभावाचा, सर्वांना आवडायचा किरण.
लातूर- किरणचा मोठा भाऊ सचिन यांना भावाच्या निधनाचा शोक अनावर झाला होता. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहात होत्या. अशा परिस्थितीत स्वत:ला सावरत माझा भाऊ मृत्यूनंतरही इतरांच्या जीवनात उपयोगी ठरला. याचा मला अभिमान आहे, असे बोलला. हृदय आणि किडन्यांच्या रूपाने तो इतरांमध्ये जिवंत राहणार असल्याचे सचिन लोभे यांनी साश्रूनयनांनी सांगितले. लातूरच्या मळवटी रोड भागातल्या सनतनगरात जन्मला...लहानाचा मोठा झाला, पण आयुष्याच्या वळणावर अंधारात तारा लुप्त व्हावा तसा तो चमकून गेला...किरण...नावालाच नव्हे, तर इतरांच्या आयुष्यातही तो आशेचा किरण बनला...शांत, संयमी स्वभावाचा... घरात सर्वांना आवडायचा किरण आणि घरातल्या प्रत्येकाचे तो ऐकायचा. किरण लोभेचा मामा महादेव डाके शासकीय रुग्णालयातून बाहेर येऊन भिंतीलगत उभे राहून भाच्याची आठवण काढून डबडबलेल्या डोळ्यांनी हुंदके देत होते. त्यांना धीर देत विचारपूस केली असता, आपण किरणचा मामा असल्याचे सांगितले. लोभे कुटुंबीय मूळचे अहमदपूर तालुक्यातील अंधोरीचे. काही वर्षांपूर्वी वडील कामानिमित्त लातूर आले आणि येथेच स्थायिक झाले. वडील सुनील लोभे हे लातुरातील गरुड चौकाकडील लाकडी मशिनमध्ये (सॉ मिल) मजूर म्हणून काम करायचे. मात्र, दुर्दैवाने त्यांचे १५ वर्षांपूर्वी अकाली निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी लताबाई यांच्यावर घराची जबाबदारी आली. लताबाई यांनी थोरला मुलगा सचिन, दुसरा विलास, मधवा आकाश आणि धाकटा किरण, अशी चारही मुले लहानाची मोठी केली. घरची परिस्थिती बिकट असल्याने सर्वजण मिळेल ते काम म्हणजे मजुरी करायचे. मामा महादेव डाके यांचे अहमदपूरजवळ जेवणाचे हॉटेल आहे. सचिन त्यांच्याकडे असतो. तर किरण कधी-कधी त्यांच्याकडे राहायचा. १५ सप्टेंबर रोजी कपडे धुतल्यानंतर ते वाळविण्यासाठी सनतनगरमधील घराच्या छतावर गेला. मात्र, पाऊस पडला असल्याने अर्थईन (अर्थिंग) तारेत उतल्याने तो चिकटला आणि विजेच्या धक्क्याने तो फेकला गेला. त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला. जखमी अवस्थेत त्याला लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र, परिस्थिती पाहून सायंकाळीच लातुरातील एका खाजगी दवाखान्यात नेले. तेथे दोन ऑपरेशन करण्यात आले. मात्र, २५ सप्टेंबर रोजी त्याचा मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे किरणला पुन्हा शासकीय रुग्णालयात आणले. सोमवारी सायंकाळी शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर किरणचा भाऊ सचिन, आई, इतर नातेवाईक आणि माझ्याशी डॉक्टरांनी चर्चा केली आणि किरणचे अवयव दान करण्याचा सल्ला दिला. आम्ही सर्वांनी विचार करून होकार दिला, असे मामा महादेव डाके यांनी सांगितले.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us