web counter
Visit Counter
सुशिक्षित बेरोजगारांसाठी ऊस उत्पादक शेतकरी समृद्धी योजना
लातूर- विकास सहकारी साखर कारखान्यामुळे ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडून येथील जीवनमान उंचवले आहे. त्यानंतर आता सुशिक्षित बेरोजगार ऊस उत्पादक शेतकरी समृद्धी योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे. जिल्ह्यातील निवळी (वैशाली नगर) येथील विकास सहकारी साखर कारखान्याची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील रुख्मिणी मंगल कार्यालयात नुकतीच पार पडली. या निमित्ताने आयोजीत समारंभात कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात सभेचे नियमीत कामकाज पार पाडल्यानंतर बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, लोकनेते विलासराव देशमुख यांनी मांजरा कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर या भागात ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. अतिरिक्त झालेल्या ऊसाचे गाळप व्हावे म्हणून शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव विकास कारखान्याची उभारणी झाली. त्यावेळेसच या कारखान्याला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव द्यावे, अशी कल्पना पुढे आली होती. मात्र, साहेबांनी अत्यंत नम्रपणे त्यासाठी अनुमती नाकारली होती. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला साजेल असे विकास सहकारी साखर कारखाना असे नामकरण करण्यात आले होते. या कारखान्याचे विलास सहकारी साखर कारखाना हे नाव देण्याचा ठराव सभासदांनी एकमताने मंजूर केला आहे. विकास, रेणा, विकास २, जागृती या कारखान्याची उभारणी होऊन एक मांजरा परिवार तयार झाला आहे. या परिवारामुळे आज एक विकासाची चळवळ निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात कोणताच घटक विकासापासून वंचित राहू नये म्हणून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्या योजनेचाच एक भाग म्हणून सुशिक्षित बेकार ऊस उत्पादक समृध्दी योजना राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुलांमध्ये शेतीबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांनी ऊस उत्पादक बनावे हा उद्देश ठेवून ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यांना कर्ज, खते, बेणे आदीचा पुरवठा करुन त्यांच्यात अधिक ऊस उत्पादन करण्याची स्पर्धा लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या योजनेसोबतच दुग्ध व्यवसायासाठी चालना देणे, विकास अॅग्रो मल्टीस्टेटची स्थापना करुन ग्रामीण भागात शेतीपुरक उद्योग उभारणी, कुक्कुटपालन, शेळी पालन अस्वस्थ व्यवसायाला चालना देणे, सेंद्रीय शेतीची संकल्पना राबवून फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन वाढविणे हे सुद्धा प्रस्तावित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us