web counter
Visit Counter
जिल्हाधिकार्‍यांनी सुरु केली नवी घंटागाडी यंत्रणा, लातूर करणार कचरामुक्त
लातूर- अलिकडच्या काळात लातूर शहराचे कचरा व्यवस्थापनाचे नियोजन बिघडले होते. शहरात जाल त्या भागात रस्त्यावर कचरा, त्यात चरणारी मोकाट कुत्री आणि जनावरे असे चित्र पहायला मिळायचे. आज जिल्हाधिकार्‍यांनी नव्या घंटागाडी यंत्रणेचे उदघाटन केले. दोन महिन्यांनी लातूर शहरात कुठेही रस्त्यावर कचरा दिसल्यास बक्षीस देऊ असं जिल्हाधिकार्‍यांनी घोषित केलं आहे. शहरातील कचरा गोळा करण्याचे काम जन आधार संस्थेला देण्यात आलं आहे. या आधीही दुसर्‍या एजन्सीच्या अधिपत्याखाली जन आधारने चांगले काम केले होते. या संस्थेसोबत केलेल्या करारानुसार घंटागाडी प्रत्येक गल्लीत येईल. नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा द्यावा. जेणे करुन त्यावर प्रक्रिया करणे सोपे होईल. दोन महिन्यांनी लातूर कचरामुक्त होईल. पुन्हा रस्त्यावर कचरा दिसल्यास तो दाखवणार्‍याला बक्षीस देऊ आणि संबंधित एजन्सीवर कारवाई करु असे सांगत ओला आणि सुका कचरा वेगवेगळा द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले. आज महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती. हे औचित्य साधून हा उपक्रम सुरु करण्यात आला. प्रत्येक गल्लीत घंटागाडी येईल, गाडी येईपर्यंत कचरा साठवून ठेवावा, कचरा रस्त्यावर टाकल्याने आरोग्याला धोका निर्माण होतो. प्रत्येक शहर स्वच्छ आणि सुंदर झाले पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्या दिशेने मनपाची वाटचाल सुरु आहे असे महापौर सुरेश पवार यांनी सांगितले. लातुरचं कचरा व्यवस्थापन सुनियोजित पध्दतीनं करु असं वचन आम्ही दिलं होतं, ही वचनपूर्तीकडे वाटचाल आहे असं उप महापौर देवीदास काळे यांनी सांगितलं. घंटागाडी आपले काम नीट करेल, नागरिकही ओला आणि सुका कचरा वेगळा करुन देतील पण तो टाकायचा कुठे हा खरा प्रश्न आहे. कारण वरवंटीचा कचरा डेपो भरुन गेला आहे. त्या भागातील गावातील रहिवासी सतत विरोध करीत असतात. त्यावर मात्र अद्याप कुणीच काहीच स्पष्ट केले नाही. या कार्यक्रमाला गुरुनाथ मगे, अजय कोकाटे, शिवकुमार गवळी, प्रवीण अंबुलगे, दीपाताई गिते, गिता गौड, श्वेता लोंढे, शैलेश गोजमगुंडे, जन आधारचे संजय कांबळे, अजय दुडीले, देवा साळुंके, रागिणी यादव, वर्षा कुलकर्णी, स्वाती घोरपडे, भाग्यश्री कौळखेरे, ज्योती आवसकर आदीजण उपस्थ्त होते.
या इंटरनेट न्यूज चॅनल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक-संचालक सहमत असतीलच असे नाही.
Copyright © 2017 MahaLiveTv - All rights reserved.
Print Friendly Version of this pagePrint Get a PDF version of this webpagePDF
सदैव तुमच्या सोबत
follow us